Breaking News
Loading...
Wednesday 24 June 2015

Info Post
गोष्ट वेड्या पावसाची

नाही राजा-राणीची
नाही मांजर-मनीची
ऐका सांगते तुम्हा गड्यांनो
गोष्ट वेड्या पावसाची

मेघांतून एकटाच आपुला
पाऊस रोज फिरत असे
कुणीच नाही खेळायला
हेच त्याचं दुःख असे

पळावया हे अथांग आकाश
पण पकडायला कुणीच नसे
गगनाच्या या अफाट जगात
जो तो आपुला मग्न असे

अशाच एका सायंकाळी
ठरविले त्या पावसाने
अंबरी नाही कुणीच सोबती
जाईन म्हणतो धरतीकडे

अंगावर काळा कोट घालून
ऐटीत तो तयार झाला
ढगांच्या रथात स्वार होऊन
दौडत दौडत पृथ्वीवर निघाला

पृथ्वीवर आगमन होताच त्याने
नद्या-सागरांना मिठी मारली
शेतात पिकांबरोबर डोलताना
हास्याची गोड कळी खुलली

फुले हसली, पाने डोलली
निर्झर खळखळून धावू लागले
या डोंगरावरून त्या डोंगरावर
पावसाचे खेळ सुरूच राहिले

असा हा खुळा पाऊस
मनसोक्त खेळून गेला
जाता जाता धरतीचेही
मन तृप्त करून गेला

अशीच झाली होती मैत्री
या पावसाची धरतीशी
कशी वाटली सांगा गड्यांनो
गोष्ट वेड्या पावसाची

~सुप्रिया गावडे, डोंबिवली

0 comments:

Post a Comment