पैठणी
फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे, कुंच्या, टोपडी, शेले, शाली
त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी रंग तिचा सुंदर धानी
माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती
पडली होती सार्यांच्या पाया हाच पदर धरून हाती
पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास
ओळखीची, अनओळखीची जाणीव गूढ आहे त्यास
धूप कपूर उदाबात्त्यांतून जळत गेले किती श्रावण
पैठणीने जपले एक तन एक मन
खास-हिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली
शेवंतीची, चमेलीची आरास पदराआडून हसली
वर्षा मागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला
नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला
पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले
अहेवपणी मरण आले आजीचे माझ्या सोने झाले
कधी तरी ही पैठणी मी धरते उरी कवळून
मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून
मधली वर्षे गळून पडतात काल पटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझे कुशल सांगा!
-शांता शेळके

0 comments:
Post a Comment