Saturday, 12 April 2014

तुझ्या गालावरची खळी...

तुझ्या गालावरची खळी..

चॉकलेटच्या कागदानी काढली हळूच खोडी,
आठवली आपल्यातली चोरटी देणीघेणी,
प्रत्येक वेळी हसताना तू हळूच मान वळवायची,
तुझ्या गालावरची खळी मला रोज प्रेमात पाडायची...

ओठ बोलण्याआधी तुझे डोळेच सगळ बोलायचे,
पापण्यांच्या आडून मला हलकेच चिडवायचे,
मिटल्या डोळ्यांपुढेही तुझीच रूपे फेर धरायची
तुझ्या गालावरची खळी मला रोज प्रेमात पाडायची...

ठरवायचो स्वत:शी, नाहीच तिथे बघायचं..
माझ्या निर्धारच बळ दहा मिनिटही नाही टिकायचं,
किती नाही म्हंटल  तरी आपसूक नजर वळायची,
तुझ्या गालावरची खळी मला रोज प्रेमात पाडायची...

माझ्या स्वप्नातली तू आजही तशीच आहेस...
शेवटच चॉकलेट मनात आजही जपल आहे,
माहित आहे मला आता नाही वाट पाहायची,
कारण ती खळी आता पुन्हा नाही दिसायची,
जी मला रोज रोज तुझ्या प्रेमात पाडायची....
तुझ्या गालावरची खळी.... 

मोनीष शेखर चौबळ

No comments:

Post a Comment